मी आणि विलगीकरण कक्ष?!

मी(पूजा पैठणकर) कॉरंटाईन काळ संपवुन आल्या नंतर माझा अनुभव शब्दांकित केला आहे –

तर याची सुरुवात होते त्या विद्येचे माहेरघर असणाऱ्या आणि सद्य परिस्थिततीमध्ये कोरोना चे हॉट स्पॉट बनलेल्या पुण्यातून, जवळपास मार्च पासून चालत काय, पळत आलेल्या कोरोना आणी संचारबंदी मूळे घरात राहून आपली घरगुती कर्तव्य बजवणारी मी, नियम शिथिल झाले की माहेरी जाण्याचा ध्यास घेतला, माहेर माझं तुळजापूर, त्यानुसार आईवडीलांशी संवाद साधला,तिकडच्या परिस्थितीचा अंदाज घेतला पण तरीही मनात धाकधूक होती, भीती इतकीच की इतके दिवस घेतलेली काळजी धुळीत नको जायला. पण माहेरची ओढ ही रोजच्या व्हिडिओ कॉल वर नाही ना भरून निघत!

आम्ही कुटुंबात पाच जण ,त्यातील दोन दहा वर्ष वयाच्या आतले आणि एक पन्नास ची व्यक्ती त्यामुळे काळजी वाटायची, एका प्रवासामुळे गडबड  नको वाटली, परिस्थिती अजून गंभीर होण्याआधी आपण जाऊन भेटून यावे, म्हणून जायचं नक्की केलं, प्रवासाच्या नियमाचे उल्लंघन न करता पास काढला, मेडिकल सर्टिफिकेट घेतलं आणि जुन्या काळात शिदोरी घेऊन निघायचे त्याप्रमाणे नाष्टा, जेवण सगळं घेऊन निघालो. विचार इतकाच होता की दुपारी आईच्या हातची चव परत खायला मिळेल.

नवरा-बायको दोघे आणि दोन मुलं असे चौघे, चारचाकीने पुण्यनगरी होऊन पहाटेच निघालो.  कारण दुपारी चार पर्यंत पोहोचून ह्यांना वर्क फ्रॉम होम साठी सज्ज व्हायचे होते आणि दुसऱ्या दिवशी परत पोहोचायचे देखील होते . आठ तासांचा प्रवास, प्रत्येक चेक पोस्ट ला पोलीस आणि त्यांच्या प्रोसीजर पार करत करत दहा तास लागले. सोलापूर आले आणि बाबांना कळवले तासाभरात पोहोचू.  पहात पहात हसत खेळत प्रवास झाला पण स्वादिष्ट अन्नात मिठाचा खडा पडावा तशी बाबांना बातमी मिळाली की तुळजापूर मध्ये एका वय वर्ष 60 च्या वरील इसमाचा कोव्हिड  मुळे मृत्यू झाला आणि सर्वच नियम बदलले तुळजापूर सील केले गेले ,न कोणी बाहेर जाऊ शकत न कोणी आत येऊ शकत, परिस्थिती अनपेक्षित होती.

भारत देशाचे सुजाण नागरिक असल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी ठरविले की आधी आपण गव्हर्मेंट हॉस्पिटल ला जाऊन स्वतः नोंद करावी की आम्ही पुण्यावरून आलो आहोत.  वाटले, की Quarantine करण्याची प्रोसिजर ही फक्त त्याचा ठसा हातावर पडेपर्यंत असेल, मग तरी आपण घरी जाऊ शकू .

पण अधिकारी आणि त्यांचे बदललेले नियम यापुढे सर्वांनी हात टेकले आणि त्यांचा समन्स आला की गव्हर्मेंट प्लेस ला quarantine ठेवावे लागेल असे समजले. नावांची नोंद झालेली होती त्यामुळे परतीचा मार्ग ही बंद झाला होता .

स्वतःच्या गावात घर सोडून राहणे हेच मुळात पचत नव्हते पुढचे पाच दिवस कसे जातील हे ठाऊक नव्हते, फक्त जे येईल त्याला सामोरे जायचे ठरवले आणि आम्ही तिथे म्हणजे तुळजापूरच्या भक्तनिवास मध्ये पोहचलो, सेपरेट रूम मिळाली पण वाटायचे व्यवस्था कशी असेल काय होईल ,आधीच पायाचे दुखणे त्यामुळे जमिनीवर झोपता येत नाही, त्यात दोन मुले आपल्यावर अवलंबून, तर आपण कमी पडता कामा नये म्हणून सर्व बळ एकवटून उभी राहिले. रूम पाहून जरा हायसे वाटले, लाइट,बेड सगळं नीट होतं.  जेवण नाश्ता सगळं आई देणार होती त्यामुळे तेथील काळजी मिटली.

परिस्थिती समोर कोणालाही ब्लेम करता येत नव्हतं पण कुठेतरी वाटायचं असं काय झालं कोणी असा निर्णय दिला आणि तो मान्यही केला गेला.  मला विचारलं का कोणी, कि  तू राहू शकशील का? पण परत वाटायचं विचारणार तरी कसे कारण तेच स्वतः आपल्याला सोडून कसे जात असतील?

भक्तनिवास ला पोहचलो, प्रवासातून आलेलो कसेबसे फ्रेश झालो.  सावी काही सोडायला तयार नव्हती, तिला सोबत घेऊनच फ्रेश झाले पाणी प्यायलो मग अहो नी घरी जाऊन रात्रीचे टिफिन आणि लागणारे काही साहित्य घेऊन आले, मला  सुपूर्त केले आणि ते परतीच्या प्रवासाला निघाले. त्यावेळी मात्र शब्द फुटेना आणि पाणी डोळ्यातून थांबेना. आई-बाबांचा समोर‌ एकवटून ठेवलेला धीर, दाखवलेले धाडस सगळे डोळ्यातल्या पाण्यात वाहून जाऊ लागले. मी घट्ट मिठी मारली जिथे अगदी सिक्योर वाटतं ‘ती जागा’ परत आपल्याला मिळेल की नाही याची धाकधूक होती. तो म्हणाला “मी आहे आणि असेल, डोन्ट वरी”, आणि पुढच्या काही दिवसांसाठीचे  सामर्थ्य, एकटीने सांभाळण्याची हिम्मत आणि तू करू शकतेस हा कायम सांगणारा त्याचा विश्वास त्याच्या डोळ्यात दिसत होता. एका जोडीदाराकडून अजून काय हवं असतं! एक गोष्ट सांगायला तो विसरला नाही, ‘आई-बाबा, विहान-सावी आता तुझ्या कडे पाहून राहतील, तू जसा विचार करशील तसे ते विचार करतील, जे तुझ्या चेहऱ्यावर दिसेल ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल, तुला ठरवायचे आहे की तू काय करशील’ आणि त्यांनी निरोप घेतला.

एकटेच पुण्याला जाणार होते, तेही टेन्शन होतंच.  एकाच दिवसात इतका प्रवास आणि जाताना एकटे  म्हणून थोडी भीती वाटत होती पण ते व्यवस्थित पोहोचले आणि जीवात जीव आला. मी ज्या संध्याकाळी त्या सेंटरला गेले त्यावेळी मला तिथली काहीच माहिती नव्हती. रात्रीचे १२ वाजले तरी एक ही डॉक्टर आला नाही म्हणून मी घाबरले होते की इथे मरायला सोडले की काय? त्या भीतीतून मला श्वास घेणे अवघड होऊ लागले, शरीराच्या थकण्यापेक्षा मेंदू आणि मन खूप थकलेले होते त्यामुळे झोप लागली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला तिथली सगळी सिस्टम समजत गेली, की कधी काय येते आणि काय होते, तेव्हापासून मला कोणत्याच प्रकारे कसलाही प्रॉब्लम झाला नाही. कारण तेव्हा डोक्यात भीती राहिली नव्हती.  पण आई-बाबांची तारेवरची कसरत चालू  झाली होती.  चहा-दुध-नाष्टा-जेवण यात दोघे अगदी बुडून गेले, आई ला वाटायचं की काही कमी नको पडायला.  बाबा टिफिन घेऊन जाताना गहिवरून यायचं, वाटे की आत्ता घरी जावं . सामानाची देवाणघेवाण करायची नाही असा नियम असल्यामुळे एका चर्मरोग असणाऱ्या व्यक्तीला दुरून जेवण-पाणी कसे देतो तसे द्यावे लागायचे.

असे करत करत पाच दिवस गेले. म्हटले चला आता घरी जाऊ, काही लक्षणं तर नव्हती.  तिघेही अगदी व्यवस्थित होतो. उलट मी तिथे ५ दिवस राहायची तयारी दर्शवली. पाचवा दिवस संपत आला संध्याकाळ झाली चौकशी केली असता समजले की आठव्या दिवशी स्वॅब टेस्ट घेतली जाते, कोवीड ची टेस्ट होईल आणि रिपोर्ट आल्यावर सोडलं जाईल. आधीच गव्हर्मेंट प्रोसिजर वर विश्वास कमी ते कासवाच्या गतीने चालतात त्यात आपण घरापासून दूर, घरी केव्हा जाणार माहित नाही. आता मात्र धीर सुटत चालला, आईशी बोलले त्यामुळे तिचाही धीर सुटला, एक-एक करून सर्वांना काळजी वाटू लागली.

तेव्हा जाणवलं घर काय असतं… जेव्हा लाॅकडाऊन घोषित झालं आणि अख्खा कामगार वर्ग आपल्या गावाच्या, घराच्या दिशेने परतू लागला तेव्हा मी म्हणायची गरज काय एवढा आटापिटा करायची? सरकार सोय करतय ना यांची, कशाला जायचं? पण नाही, मला जाणवलं की सरकारने भलेही सर्वांची सोय पंचतारांकित मध्ये केली असती तरीही सगळे घरीच जायचं म्हणाले असते.

एक माय माऊली प्रसूत होऊन सुद्धा त्या बाळाला घेऊन अखंड रात्र पायी  गेली, काय वाटत असेल तिला? स्वतःला  तिला, तिच्या त्या बाळाला त्यांच्या हक्काचे छत डोक्यावर केव्हा दिसेल? इतकी सहनशक्ती कुठून आली असेल तिच्या मध्ये, ते म्हणतात ना – “घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती”, तसेच. तरीही घर, त्या चार भिंतींची ओढ कशी लागते  मनाला,  आणि मी तर अशा ठिकाणी होते जेथे माझा जन्म झाला, माझं बालपण गेलं, त्यात घरी जाण्यासाठी एवढे अडथळे??

या परिस्थितीतून पसार झाल्यावर मी म्हणेन की कॉरोना हे निव्वळ थोतांड आहे. कॉरोना हा आजार आहे हे नक्कीच पण त्याचा एवढा मोठा फुगा केलाय की सांगता सोय नाही. हा फुगा एकेदिवशी फुटेल हे मात्र नक्की. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या होस्टेलमध्ये काय केलं असेल की मी हे असं बोलतीये मी… तर विलगीकरण कक्षात कधीमध्ये येणारे डॉक्टर आणि दोनवेळा ऑक्सीमीटरने पडताळणी. तुम्ही स्वतःहून काही माहिती मागितली तरच मिळेल अन्यथा नाही. काही त्रास होतोय का? ताप आहे का? कुठून आलात? किती जण आहात? हि विचारपूस वगळता प्रशासनाकडे देण्याइतपत दुसरं काहीच नाही. ह्या रोगावर उपाय नाहीच. पण ह्या रोगावर प्रतिबंधात्मक योजना आहेत. भरपूर जेवण, व्हिटॅमिन सी, प्राणायाम, गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सुरक्षित अंतर हेच ते उपाय.  तुम्हाला विलगीकरण कक्षामध्ये फक्त सामाजिक अंतर ठेवण्यासाठी पाठविले जाते.  कारण आपण स्वतः कॉरोना संशयित असून सामाजीक अंतर पाळायचं भान कदाचित घरी तितकंसं ठेऊ शकत नाही.

मूळात विलगीकरण म्हणजे काय? आणि त्यांच्या नियमांचे कसे काटेकोर पालन करायला हवे, हेच जनतेला समजतचं नाहीय…. नैराश्य काय असतं याची सुरुवात मी पाहिली, अनुभवली बहुतेक…

“मौनाचा चालतो मौनाशी संवाद | उमटतो नाद अनाहत ||”

याप्रमाणे टेस्ट होण्यापूर्वीच्या दोन दिवसात वेळ जाता जात नव्हता.. दिवस कसेतरी काढायचे, मुलांसोबत त्यांच्या गरजा पुरविण्यास वेळ जायचा, पण रात्र झाली की भीती वाटायची, समजा रातोरात काही झाले…  आपली सकाळ झालीच नाही तर मुलं काय करतील, जी आज आपल्यावर अवलंबून आहेत त्यांचं काय होईल…  कधीतरी वाटायचं रात्रीतून निघून जावं मुलांना घेऊन, ते म्हणतात ना रिकामं डोकं……

पण मुलांकडे पाहायचे आणि समर्थांचे नाव घ्यायचे, मन शांत व्हायचं आणि झोप लागायची.

आठव्या दिवशी फोन आला आज तुमचे स्वॅब घेतले जातील. धाकधूक होती. खूप भीती वाटत होती पण गुरु ठाकूर यांचे काही शब्द आठवले –

“शोध तूच आता दुर्गा तुझ्यातली!”

कारण पर्याय नव्हताच, टेस्ट होणार होतीच.  त्याला सामोरं जावं लागणार होतं त्यामुळे स्वतःच्या आणि मुलांच्या मनाची तयारी करणं गरजेचं होतं , विहानला समजावू शकत होते, पण सावीच काय?  ती रिऍक्ट कशी करेल याचा अंदाज नव्हता.‌ पंधरा महिन्यांच्या सावी ची टेस्ट करताना त्या परिचारिका सुद्धा काळजीत होत्या, त्यांचे धैर्य होत नव्हते, इवल्याशा नाकामध्ये एअर बड सारखी कापूस लावलेली काडी घालून स्वॅब घेतले गेले, नंतर विहान ची टेस्ट झाली आणि मग माझी. रिपोर्ट बद्दल विचारणा केली असता समजले की ते येण्यासाठी दोन दिवस लागतील, ते बहुदा निगेटिव्ह येणार होतेच, पण तरीही वाटायचं समजा ते मिक्स झाले आणि पॉझिटिव्ह आपल्या नावाने आले तर…?

पण रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि सर्वांचा जीवात जीव आला…! फायनली एक अध्याय संपत आला आणि रिपोर्ट आला तो दिवस रविवार होता.  वाटलं की गव्हर्मेंट हॉस्पिटलला सुट्टी म्हणजे अजून एक दिवस जाणार, पण समर्थांची कृपा कि तसे झाले नाही आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिघे घरी आलो…!!

जे घर आणि जिथली माणसं आमची आतुरतेने वाट पाहत होती, चिमणी पाखरे घरट्यात एकत्र परतलो. ना फोटो ना व्हिडिओ फक्त स्मरणात राहील अशा ह्या आठवणी. यातच सगळं आलं, वाटायचं जिथे माणसं असतात तिथे घर केव्हाही होऊ शकतं आणि या प्रसंगानंतर जाणवलं की फक्त माणसंच नाहीत तर घरसुद्धा ठरवतं किती कोणामुळे आणि केव्हा आनंदी व्हायचं.

प्रशांत दामले यांच्या गाण्याप्रमाणे

” सुखं म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असतं की ते ‘घर’ बसल्या मिळतं”…….

 विलगीकरण कक्षाची शिकवण:

1.आयुष्यात काही गोष्टी फुकटात मिळतात त्याची किंमत करायला शिकले . उदा. Oxygen

2.ह्या काही दिवसात एकटाच सर्व प्रवास करायचा असतो. डोक्यावरून मायेचा हात फिरवायला पण कोणी नसते. अशा वेळेस आप्तेष्टांच्या फोन वरचा आवाज, सर्वांचे काळजीचे आणि प्रेम भरे संदेश हीच आपली ताकद असते.

३.कोणीतरी आपल्यासाठी आणि आपण कोणा-कोणासाठी महत्त्वाचे आहोत, हे समजले.

तेथून बाहेर पडताना येणारे अनुभव, लोकांची नजर आणि भीतीने लांब राहण्याचा प्रवृत्ती हे सर्व नवीन होतं.

परमेश्वराकडे एकच प्रार्थना –

 

“सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।

सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥”

 

धन्यवाद!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *